जगता जगता रोज आपण किती मुकामार सहन करत असतो... ब~याचदा असा मार आपल्या लक्षातच येत नाही किंवा तो अंगवळणी पडलेला असतो. अशा मुकामाराविषयीचं हे बोलणं...
Monday, July 25, 2011
अ'राजकीय'
एक सन्माननीय राजकीय महाशय! (नुकतच त्यांच्या निवडीवरून एका राजकीय पक्षात मानापमान-संशयकल्लोळ-नाथ हा माझा-नाथा पुरे आता अशा आशयाच राजकीय नाट्याच क्रमशः थेट प्रक्षेपण घडून गेल्याचं आपल्या लक्षात असेलच. नेमक्या त्याच टायमाची गोष्ट.)(नाव मुद्दामहून सांगत नाही. घाबरतो. माफी!) सोयीसाठी त्याचं नाव आपण ‘अमुक अमुक’ असं मानू.
मुद्दा असा... की एका नामांकित दवाखान्यात गर्दीच्या वेळी फोन खणखणला आणि अचानक गडबड सुरु झाली. रिसेप्शनिस्टबाई डॉक्टरांच्या केबिनमध्ये पळाल्या. केबनही कधी नव्हे ते अस्वस्थ झालं. रांगेतले पेशंट आणि त्यांचे नातेवाईक संदिग्ध होऊन पाहू लागले. रिसेप्शनिस्ट काउंटरवर येताच "काय झालं हो? सिरीयस आहे का काही?" वगैरे वगैरे म्हणत नातेवाईक-पेशंट सरसावले. रिसेप्शनिस्ट म्हणाली; "अमुक अमुक त्यांच्या मुलीला घेऊन येत आहेत." आता हे अमुक अमुक नेमक्या त्याच काळात भलतेच हिट झाल्यामुळे गर्दीत कुजबुज वाढली. इतक्या वेळ अंगातली दुखणी घेऊन बसलेल्या बाकड्यांवर राजकीय दुखणी कण्हली जाऊ लागली.
जेमतेम दहाच मिनिटात अमुक अमुक महाशयांनी दवाखान्यात एन्ट्री मारली. रिसेप्शनिस्टबाईंनी ‘जबाबदारी’च्या ओझ्याखाली आपली भूमिका हसतमुख पार पाडली आणि केबिनचे दार उघडे करून दिले. आत जाण्यापूर्वी अमुक अमुकांनी पेशंट आणि नातेवाईकांकडे कृतार्थ नजर टाकली . वर आशिर्वादासारखा हातही उंचावला. लोकही आस्ते आस्ते सुखावले. कारण सुरवातीला सगळ्यांना असं वाटलं की ते कुण्या ओळखीच्या माणसालाच हात करताहेत. सगळ्यांनी एकमेकांकडे पाहून झाल्यावर काय ते ओळखलं.
हा ‘राजकीय पेच’ निर्माण झाला आणि नेमक्या त्याच वेळी ज्यांचा नंबर आला होता त्या सूनबाई जाम वैतागल्या होत्या। आपल्या ९२ वर्षांच्या सासूबाईंना लांबवरून आणून त्या दीडतास दवाखान्यात बसल्या होत्या. अमुक अमुक आत गेल्यापासून त्या फक्त रिसेप्शनिस्टपाशीच तळ ठोकून होत्या. "ही काही पद्धत झाली का? आधी सांगायला काय होतं? म्हातारं माणूस आहे. नंबर लावून काय फायदा?" वगैरे वगैरे. सुनबाईंच्या चढलेल्या पा-यामुळे म्हणा (अज्ञान होतच) की काय पण हे अमुक अमुक महाशय म्हणजे नेमके कोण नि काय याचा थांग पत्ता बाईना नव्हता. त्याचं नाव सोडलं तर त्यांच्या विषयी इतर काही माहिती करून घ्यायची तसदीही त्या बाईंनी मिळालेल्या वेळेत घेतली नाही. झालं...
वीसेक मिनिटांच्या तपश्चर्येनंतर अमुक अमुक पुन्हा त्याच कृतार्थतेची भावना चेहऱ्यावर घेऊन केबिनबाहेर आले. स्मित हास्य करत लोकंकडे बघतो न् बघतो तोच अमुक अमुक महाशयांवर त्या वैतागलेल्या सूनबाई कडाडल्या. अहो! एक मिनिट, तुम्ही जे कोणी असाल आम्हाला काही घेणं नाही. आम्ही काही मुर्ख आहोत का चार चार दिवस आधी नंबर लावायला आणि दोनदोन तास इथे वाट बघत बसायला? आले की चालले आत. जग म्हणजे काही जहागिरी वाटली काय?" बाईंचा टिपेचा स्वर ऐकून डॉक्टरही बाहेर आले.
आता यावर त्या महाशयांना शांत राहून मुद्दा हाताळताही आला असता. पण तेही त्या सुनबाईंच्या तारेला तार जुळवत म्हणाले ; "ओ बाई तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कुणाशी बोलताय?". बाई त्यांचा चढा आवाज ऐकून किंचित गडबडल्या ख-या पण वैतागाच्या भरात रिसेप्शन काउंटरवरची वही उलगडून म्हणाल्या; "ही आजची डेट आणि ही आज अपॉइंटमेंट असलेल्या पेशंट्सची नावे. यात मला तुमचं नाव दाखवा." तोच काही लोकांनी मध्ये पडून "सोडून द्या ताई. होतं असं. तेही बरेच बिझी असतात" असं सांगत प्रकरण शमवण्याचा प्रयत्नही केला. पण तरी त्या अमुक अमुक महाशयांचं नमतं म्हणून नाहीच; "हे बघा बाई मी दवाखान्यात एक फोन केला. मुलीसाठी सांगितलं, दवाखान्यातून ‘या’ असं मला कळवलं तेव्हा मी इथे आलोय. आता दावाखान्याने मला आधी नंबर दिला असला तर त्यात माझी काय चूक?" मुद्दा डॉक्टरांच्या कोर्टात गेल्यामुळे महाशयांची सरशी होणार असा विचार सगळ्यांच्या मनात येतो न् येतो तोच बाईंनी फूलटॉस टाकला. "वा वा वा वा. फोन केलात हे खरंय हो आम्ही सगळे इथेच होतो. पण त्या फोनवर आपण कोण आहात हे सांगायला नाही विसरलात ते? डॉक्टर काय करणार? " खेळ खल्लास.
अमुक अमुक महाशय तिरसटपणे मान झटकून दाराबाहेर पडले. सूनबाई सासूबाईंकडे वळल्या. लोकांमध्ये जरा खसखस पिकली. सूनबाईंच्या धाडसाचं नि त्याहून जास्त त्यांच्या हजरजबाबीपणाचं सगळ्यांनी अप्रूप व्यक्त केलं. शेवटी ९२ वर्षांच्या त्या आजीबाईंना घेऊन त्या डॉक्टरांसमोर बसल्या तेव्हा सूनबाई डॉक्टरांना म्हणाल्या; "माफ करा डॉक्टर. आमच्यामुळे...". डॉक्टर तत्काळ प्रांजळपणे म्हणाले ; "माफी कसली मागताय? उलट मीच तुमचे आभार मानायला हवेत. जे काम मला इतक्या वर्षात जमलं नाही ते तुम्ही चुटकी सरशी करून दाखवलंत. थँक्स!"
समांतर आणि सकारात्मक
किस्सा जवळपास तसाच. पात्रं वेगळी. (भ्यायचं कारण नाही म्हणून सागतो), कोथरूडच्या महात्मा सोसायटी वॉर्डचे मनसेचे नगरसेवक राजाभाऊ गोरडे यांच्या पत्नी याचं परिसरातल्या एका क्लिनिकमध्ये तपासणीसाठी गेल्या. ही गर्दी. (आपल्याकडं गर्दीला काही तोटाच नाहीये राव. जेवढे लोक क्रांति करायची म्हणताहेत तेवढ्याच लोकांना याच क्रांतिविषयी काही कल्पनाच नाहीये. असो. हे उगीचच :) क्रिएटीव्ह. असतो एकेकाचा पिंड.)
मुद्दा असा की मिसेस गोरडे क्लिनिकला गेल्या नंबर लावला. (आपण कोण आहोत हे त्यांनी मुद्दामून सांगितलं नाही; आणि ना त्या क्लिनिकच्या पोरीला ते माहित होतं.)
रांगेतल्या काही माणसांनी मात्र त्यांना ओळखलं आणि आपल्या पत्नी ऐवजी तुम्ही गेलात तरी चालेल अशी आदर वजा विनंतीही त्यांनी मिसेस गोरडेंना केल. तासाभराच्या त्या प्रतीक्षेत विचारणार्या प्रत्येकालाच त्यांनी शांतपणे उत्तर दिले, "नो, थँक्यू. माझा नंबर आला की जाते मी."
तात्पर्य :
आपल्या पदाचा अन् अधिकाराचा गैरवापर राजकीय लोकच करतात असं नाही. आपणही आपल्या पातळीवर तेच करत असतो. (राजकारण्यांना बदामान करणे हा या लेखामागचा उद्देश नव्हे.) आपल्याच अशा वृत्तीमुळे काही राजकारणीही असे वागायला धजावत असावेत. शेवटी मुठभर लोकांच्याच विकासाला आपणच कारणीभूत असूच ना?
(शंकेला आणि सुधारणेला बराच वाव)...
Wednesday, May 25, 2011
आईस्क्रीम : बचके रहना ...
आईस्क्रीम खायला तसं सगळ्यांनाच आवडतं. आणि आता तर उन्हाळाच काय पण १२ महिने आईस्क्रीम खायची एक संस्कृती तयार झाली आहे. मधुमेही रुग्णांसाठी देखील शुगर फ्री पर्याय उपलब्घ झाले आहेत. बड्या बड्या कंपन्या आकर्षक आउटलेट्स उघडून खवैय्ये मंडळींना मेजवानी देण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतो आहोत. पण याच आईस्क्रमच्या पडद्यामागे अनेक गोष्टी आहेत. कदाचित त्या पासून आपण अनभिज्ञच आहोत.
मध्ये एका मिटींगसाठी आमच्या एका सरांनी मला हॉटेलमध्ये बोलावलं होत. तेव्हा माझ्या आधी सरांची अजून एका माणसाबरोबर मिटींग चालू होती. मी त्यांच्या मिटींगचा प्रेक्षक झालो गेलो. तो माणूस आईस्क्रीमचे निरनिराळे आणि नवनवीन फ्लेवर्स बनवतो आणि आईस्क्रीम कंपन्यांना विकतो. आता त्याला स्वतःचे आउटलेट उघडायचे आहे. त्यासाठी फायनांस करा म्हणून तो त्या सरांना पटवत होता. तो जे काही सांगत होता ते ऐकून मी उडालोच.
त्याच्या म्हणण्यानुसार त्याने अनेक नवीन फ्लेवर्स बनवले आहेत. जे काही कंपन्यांनी विकत घेतली असून सध्या मार्केटमध्ये लोकांना खूप आवडताहेत. ते आवडणाऱ्यात मीही एक होतोच.
तो म्हणाला ; “आता मी लेमन आईस्क्रीम मध्ये ४ नवीन फ्लेवर्स बनवले आहेत. जे मला कुठल्याच कंपनीला विकायचे नाहीयेत. हे फ्लेवर्स लोकांना खूप आवडणार आहेत. ज्याचा आपल्याला आउटलेट उघडून फायदा उठवता येईल. ”
त्यावर सरांनी त्याला एक साधा प्रश्न विचारला की ; “समजा आपण आउटलेट उघडलं आणि तुझा हा लेमन फ्लेवर लोकांना आवडला नाही तर तू त्या लेमन फ्लेवरचे जे उत्पादन करशील ते किती दिवस राहू शकत? लोकांना ते आवडेपर्यंत जो काळ जाईल तोवर ते आईस्क्रीम वाया जाणार मग ते नुकसान कुणी सोसायच? ”. पुढे सरांचे अनेक प्रश्न होतेच. वीज खर्च, दुध , कच्चा माल इत्यादी.
त्यावर तो आपले तंत्रज्ञान किती भारी आहे हे सांगताना म्हणाला की ; “त्याची काही काळजी करू नका. मुळात हे आईस्क्रीम कधीच खराब होत नाही. अगदी आठ दिवस लाईट नसले तरीही... ”
आम्ही चकित झालो . सरांनी विचारलं ; “ते कस काय? दुध आहे ते खराब होणारच.”
तो तत्काळ म्हणाला ; “छे छे. दुधापासून आईस्क्रीम बनवण्याचे दिवस केव्हाच संपलेत. ”
“मग कशापासून बनवतोस बाबा आईस्क्रीम ?”
“डालडा तुपापासून!”
“डालडा तूऽऽऽऽप?”
“आज काळ एखाद दोन कंपन्या सोडल्या तर सगळे डालडाच वापरतात आणि त्यामुळेच ते परवडतं. आता आईस्क्रीम मध्ये एकही थेंब दुध नसतं. डालडाला थोडी प्रोसेस केली आणि त्यात फ्लेवर्स मिक्स केले की कळतही नाही की डालडा तूप आहे. शिवाय ते दुधाच्या आईस्क्रीमपेक्षा खाताना जास्त मऊ लागतं. आणि तेच लोकांना आवडतं. डालडा आईस्क्रीम जिभेवर येताच त्वरित विरघळते आणि गिळले जाते. शिवाय थंडपणा आणि तुपकटपणा यामधून तोंडात जे तयार होते ते नक्की काय आहे हा विचार लोक करीत नाहीत. पण तेच लोकांना आवडते. लोक अशाच स्वादाला पसंती देतात. ”
तो भरात येऊन त्याच्या तंत्राच मार्केटिंग करत होता आणि आम्ही आमचा इतिहास पोटात ढवळत बसलो होतो.
पुढे तो सांगत होता; “डालडा आईस्क्रीमचं वैशिष्ट्य असं की ते डालडा सामान्य तापमानात कितीही काळ राहिला तरीही अजिबात खराब होत नाही. याउलट दुधाला मात्र सारखं फ्रीजिंग लागतं. शिवाय दुधाच्या आईस्क्रीमला ८-१० दिवसांनी वास येतो. आणि १५ दिवसात ते खराब होऊन जातं. त्यामुळे खर्च वाढतो. डालडा आईस्क्रीम २ वर्ष फ्रीजच्या बाहेर राहिलं तरी फरक पडत नाही, त्याचे फ्लेवर्सही खराब होत. नाहीत.
डालडा आईस्क्रीमसाठी लाईट खुपच कमी लागते. १० डिग्री तापमानातही त्याचा आईस्क्रीम फील येतो. तर दुधाच्या आईस्क्रीमसाठी उणे तापमानाची (नक्की किती ते लक्षात नाही.) गरज असते. सहाजिकच दुधाच्या आईस्क्रीमच्या विजेचा खर्च वाढतो.
शिवाय दुधापेक्षा डालडा कच्चा माल म्हणून जास्त स्वस्त आहे. तस ते हाताळणी आणि प्रोसेसलाही खूप सोपे आहे. दुधाचे रोजचे कलेक्शन, त्याचे फ्रीजिंग आणि साठवण याचा विचार करता त्याची जी बेसिक किंमत होते. त्या किंमतीतही लोकांना ते आईस्क्रीम खाण परवडू शकत नाही. डालडा आईस्क्रीम मध्ये खूप मोठे प्रोफिट मार्जिन आहे. म्हणूनच आजकाल इतके पॉश आईस्क्रीम आउटलेट निघू शकतात. ”
“डालडा आईस्क्रीम उत्पादनाचा आणखी एक फायदा असा आहे की एकच प्रोडक्शन युनिट चालवून भारत भर कुठेही आपण याचे वितरण करू शकतो. तेही कमी खर्चात. दुधाच्या आईस्क्रीमला तो बेनिफिट नाही. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रोडक्शन युनिट सुरु करावे लागेल.”
तो रंगात आला होता. त्याने त्याचे नवीन लेमन फ्लेवर टेस्ट करायला दिले. मला डालडा आईस्क्रिम खाल्ल्यामुळे नक्की काय तोटा होतो ते माहीत नाही. पण त्यानंतर आईस्क्रीम खायची मजा निघून गेली इतकं नक्की.
Saturday, January 22, 2011
संजयचा खून आणि ...
http://timesofindia.indiatimes.com/city/pune/Kothrud-NCP-leader-shot-dead/articleshow/6313196.cms ,
http://www.indianexpress.com/news/Gangster-Sanjay-Marne-murdered/660451 )
संजय जाणारच होता. भर चौकात रक्ताच्या थारोळ्यात. हे त्यालाही ठाऊक होतं. वेगळं काहीच घडलं नाही.
मी हे ठामपणे म्हणतोय कारण संजय माझा मित्र होता. वर्गमित्र-बेंचमित्र. लहानपणापासून तो जाईपर्यंत वरवर का होईना पण माझा त्याच्याशी मैत्रीपुरता संबंध होता. त्यामुळेच त्याच्या बाबतीतल्या ब-यावाईट गोष्टी मला अनुभवयला मिळाल्या आहेत. कुख्यात गुंड ही उपाधी घेऊन संजय ‘नावा-रूपाला ’ आला आणि गेला. एरव्ही असा कुठलाही गुंड गेला असता तर “बरं झालं, असंच होत त्यांचं” अशा शब्दांतच मी आणि माझ्या मित्रांनी प्रतिक्रिया दिल्या असत्या. तेही प्रतिक्रिया द्यायच्या सवयीमुळे. अन्यथा तेही केलं नसतं. आज सहा महिने होऊनही संजय डोक्यातून गेला नाही. लहानपणापासून त्याला पाहिलं होतं. यातून मला संजय मारणेचं उदात्तीकरण करायचय असा अर्थ घेऊ नका. त्यासाठी फ़िल्मस पुरेशा आहेत.
शाळा आणि पाळण्यातले पाय...
आम्ही एका खेडेगावात एका शाळेत एका वर्गात होतो. संजयचे पाळण्यातले पाय ६ वीत असताना दिसल्याच विशेष आठवते आहे. मुळशी-मावळात बिबा किंवा बिबई नावाचे एक झाड आहे. त्याचा चीक अंगावर उततो. म्हणजे अंगावर पुरळ येतात , मोठाले फोड येतात , त्वचा भाजल्यासारखी होऊन जाते. तर या बिब्याचा चीक जमवून संजयने त्याच्या डाव्या हाताच्या दंडावर ‘मर्द’ असा शब्द स्वतःच्याच हाताने आयुष्यभरासाठी गोंदवून घेतला होता. बाकी आम्हां मुलांसाठी हा विषय खुप चर्चेचा ठरला होता. बाईंनी त्याला त्यासाठी दोन दिवस वर्गाबाहेर कोंबडा करून शिक्षा दिल्याचही आठवतय. आम्ही त्याला पुढे शाळा सोडेपर्यंत तो मर्द वाला त्वचेवरचा डाग भाया वर करुन दाखवायला लावायचो. हा मर्द शब्द त्याला कुठल्याशा एका चित्रपटानेच देऊ केला होता.
तसा तो भांडकुदळ किंवा अहंकारीही नव्हता पण खुप खोड्या करायचा. अर्थात वर्गात इतरही बरीचशी मुले त्याच कॅटॅगरीतली असल्यामुळे तेव्हा संजय वेगळा ठरला नाही.
याउलट संजय अभ्यासात बरा होता. त्याचं अक्षर छान होतं. दर वर्षी होणा-या गॅदरींगमधेही संजय आवर्जून भाग घ्यायचा. नाटकासाठी लागणारं पाठांतर संजयकडे होतं. शाळा बुडवून इतर मुलांसारखे उद्योग त्याने केले नाहीत. त्यामुळे वर्गातल्या अॅव्हरेज मुलांसारखाच तोही एक.
शाळेनंतर...
दहावी नंतर आमच्याबरोबरीचे बहूतांश मित्र पुण्यात आलो. (रोजीरोटी, शिक्षण या कारणांसाठी) यात मी आणि संजयही होतोच. संजयने दहवी नंतर शिक्षणाच्या आईचा .... घो केला. मग आम्हा सर्वांचाच रोजचा संबंध संपला होता. कधे मधे कुणाकुणाची भेट झाली की एकामेकांविषयी चर्चा व्हायच्या. त्यात मला संजय वरचेवर भेटायचा त्याचं कारण म्हणजे त्यावेळी तो सिटर रिक्षा चालवित असे. मी कॉलेजला जाताना ब-याचदा त्याचीच रिक्षेत गेलोय. साधारण ३ वर्षे आम्ही असे भेटायचो. गावच्या, मित्रांच्या, शाळेच्या अशा रूटीन गप्पा व्हायच्या. शाळेबाहेर आणि गावाबाहेरचे हे संबंध मला छान वाटायचे. आणि बहूदा त्यालाही. पण नंतर माझ्याकडे गाडी आल्यामुळे ते वरचेवर भेटणंही कमी झालं.
एक किस्सा ...
पुढे साधारण वर्षभराने संजय मला रस्त्यात भेटला. त्याची बॉडी लॅंग्वेज आणि पोषाखात बरीच सुधारणा होती.
मी विचारलं “हल्ली दिसत नाहीस?”
त्यावर त्याने आपण रिक्षा चालवणे सोडून केबलचा आणि गॅरेजचा व्यवसाय सुरू केल्याचे सांगितले. मला आश्चर्य वाटले. इतक्या कमी वयात संजय सेटल होत होता. याउलट मी अजून शिकतच होतो. मला त्याचे कौतुक वाटले.
पण नंतर चहा पिता पिता तो म्हंटला; “ कमल्या आपन आता अजून एक बिझनेस सुरू केलाय. सुपारीचा.”
मी विचारलं; “काय सांगतोस? येवढ्या सुपा-या खपतात की सुपारीचा बिझनेस होईल.”
तो हसला म्हणाला; “खायची सुपारी नाय. द्यायची आणि घ्यायची सुपारी.”
माझं त्यावेळचं अज्ञान पाहून संजय शांतपणे आणि विस्ताराने सांगू लागला ; सिनेमात असते तशी सुपारी. म्हणजे एखाद्या माणसाचं कुठलं तरी काम आडून आहे ते सरळ मार्गाने होत नाहीये तर मग ते दुस-या मार्गाने करायचं. भाईगिरी करून. अशा कामाला सध्या खुप डिमांड आहे. पैसापण खुप आहे. कुठं रोज रोज मगजमारी करत जगा.
मी गमतीने म्हंटलं; “म्हणजे तूला वास्तव मधला ‘संजूबाबा’ व्हायचय तर...”
त्यावर त्याने शर्टचे एक बटन उघडून गळ्यातली जाडजूड चेन दाखवली आणि हातावर टाळी मारली.
जाता जाता म्हणाला ; “तुला कुणीही त्रास दिला तर आपल्याला सांग. पार जीव्व मारायचं असलं तरी सांग. आपल्या माणसांसाठी काम नाय करायचं तर मग कुणासाठी? ”
मी म्हणालो; ( अर्थात गमतीनेच. त्यावेळी मला कविता लिहिण्या-वाचण्याचं भारी वेड जडलं होतं. त्यामुळे) “ठिक आहे. मला कुणाला मारावसं वाटलं तर मी तुला सांगेन आणि समजा तुझ्या आयुष्यात असा कुणी माणूस आलाच की जो जगण्याला वैतागलाय तर तू त्याला माझ्याकडे पाठव. मी त्याला जगायला प्रवृत्त करीन.”
माझ्यासाठी महत्वाची ठरलेली गोष्ट अशी की त्यावेळी मी जे बोललो त्याचा अर्थ संजयला व्यवस्थित कळला होता कारण नंतरच्या प्रत्येक भेटीत संजय माझ्याशी खुप तारतम्य राखूनच बोलला.
पुढे पुढे...
पुढे एके दिवशी एका खुनात संजयचा हात असल्याची बातमी वर्तमानपत्रात झळकली आणि झोप उडाली. मग गावाकडचा कुठलाही माणूस भेटला तरी संजयचा विषय निघाला नाही असं नाही. काही जणांना तो खुप पुढे गेला असं वाटलं. तर काहींना त्याचा आणि आमचा काहीच संबंध नाही इतपतच मत नोंदवण्यात धन्यता वाटली. खंडणी, खुन, अपहरण अशा बातम्यातून संजय वाचायला मिळू लागला.
मी एका मित्राला म्हंटलं; “संजय जे करतोय त्याचा शेवट काय होतो हे त्याला कळत असेल म्हणजे झालं”.
त्यावर मित्र म्हणाला; “जाऊ दे रे. हल्ली पैसा खुप महत्वाचा आहे. तो त्याच्या जीवावर कमवतोय. आज त्याच्याकडे २ फ्लॅट आणि २ अलिशान गाड्या आहे. आपल्या सात पिढ्या विकल्या तरी येतिल का येवढे पैसे?”
मला काय बोलावं ते कळेना. मीच कन्फ्यूज झालो.
गुंड झाल्यानंतरच्या भेटी...
अर्थात नंतर आम्ही संजयची चर्चा करत असलो तरी त्याला भेटणे टाळू लागलो तो ज्या एरीयात बसायचा तिथे शक्यतो जायचे नाही. तोंड लपवायचे वगैरे. कारण नंतर त्याच्याशी काय बोलायचे हाच खुप मोठा प्रश्न होता.
गुंड म्हणून जग जाहीर झाल्यावर संजय एकदा भेटला. मला भीती वाटत होती. उगीच इकडची तिकडची विचारपूस झाली. मग त्याने चहाचा आग्रह केला. बसलो. चहाचं फर्मान सुटलं. म्हणाला; “हल्ली गावातलं कुणी भेटतच नाय. सगळी पोरं काम धंद्याला लागलीत.”
मी “हं” करत होतो.
मी काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं; “लग्न केलस का रे?”
तो तत्काळ; “हो. दोन महिने झाले. (अजून धक्का). तुला बोलवायचं राहिलं. घाईत झालं. एका खुनासाठी सहा महिने जेल मधे होतो. मग बाहेर आल्यावर लगेच लग्न केलं. पुढचं काही सांगता येत नाय ना... आता आपण लै फेमस झालोय. *** चा आपण उजवा हात झालोय. त्यांनीच जेल मधून सोडवलं. लग्नासाठी एक पाच गुंठ्याचा पिस दिला एका बिल्डरनी.”
संजय बोलतोय म्हणूण मी धाडसाने विचारलं; “तुला हे सगळं करताना भीती नाही का वाटत?”
म्हंटला;“कुनाची भीती? आपल्याला लोक घाबरतात. आपण नाय कुनाच्या बापाला भीत.”
मग पुढे कधे मधे संजय आणि मी भेटलो. नंतर त्याची भीती नाहीशी झाली पण त्याच्या ‘प्रतापां’विषयीचे कुतूहल वाढत राहिले.
नंतर भेटलो तेव्हा तो म्हणाला; “काय कमल्या, बिझनेस चालू केलास कळवलं नाहीस. हिच का दोस्ती? बरोबरे तुम्ही आम्हांला कशाला बोलवाल? तुमचे दोस्त स्टॅंडर्ड.”
त्याला माझ्या कामाविषयी कुणाकडून कळलं होतं. त्यावर मी काही तरी सारवासारव करून वेळ मारून नेली. पण त्यातून संजयला समाजात टिकून राहण्याची गरज दिसली.
त्यावेळी तो म्हणाला होता की बिझनेसमधे पेमेंट थकलं, कुणी त्रास दिला तर सांग. सगळे लोक चांगले नसतात. तुझं काम करून देईल. तुझ्यासारख्या सज्जन माणसाचं काम करुन पूण्यच मिळेल.
(त्याच्या सुपारीच्या क्षेत्रामुळे मी त्याला ‘सज्जन’ वाटणं सहाजीक असावं. असो.)
पण त्यावेळी वेळापुरता का होईना मला संजयचा आधार वाटला. वर्थ सिच्यूएशनला एक तरी हक्काचं माणूस मागे असल्याचा. (पुढे अशी गरज पडू द्यायची नाही आणि पडली तर हा मार्गही निवडायचा नाही हेही उमगलं.)
मी एकदा विचारलं की तुला जीवाची, पोलिसांची इतकी भीती आहे मग हा धंदा सोडावासा वाटत नाही का?
त्यावर तो म्हणाला की रिस्क सगळीकडे असते. इथे जरा जास्त. डायरेक्ट वरचा रस्ता. त्याची भीती वाटते कधी काय होईल नेम नाही. म्हणूनच आता मी राजकारणात उतरणारे. कॉर्पोरेशनला. (धक्के पे धक्का) *** शी बोललोय. त्यांनी तिकीटाचं कबूलही केलय. मग आता वॉर्डात रक्तदान, वॄक्षारोपण चालवलय. शाळा काढणारे. लोकांचा पाठिंबा आहे आपल्याकडं. ऑफिस टाकलय. वगैरे.
त्यावेळी मात्र मला चरचरल्यासारखं झालं. उद्या संजयसारख्या माणसाला आपण आपला नेता म्हणून पहायचं? त्यात तसं करून त्याचे बाकीचे धंदे बंद होणार असते तरी काही हरकत नव्हती. पण तशी शक्यता तरी कुठली. तो जीवाच्या भितीने सेफ व्हायला राजकारणात येऊ पाहत होता. संजय बरोबरच्या गप्पातून लॅंड माफिया, बिल्डर्स आणि राजकारणी यांचं परस्पर हितसंबंधांचं साटोलोटं समजलं. दुसरीकडे आपण सगळे सामान्य माणसं यापासून किती दूर आहोत हेही उमगलं.
संजयचा खुन...
संजयचा खुन झाल्याची बातमी मला आमच्या एका मित्राने सांगितली. तेव्हा तो म्हणाला की तू जे म्हणायचास तसच झालं पण हे येवढ्या लवकर होईल असं वाटलं नव्हतं. संजय गेला हा संजयच्या बाबतीतला फायनल धक्का होता. खरच हे इतक्या लवकर होईल असं ध्यानीमनी नव्हतं. पण हे होणार होतं हे खरं.
संजयच म्हणाला होता एकदा “तसा भरवसा नाही कधी काय होईल. इतक्या लोकांचे तळतळात आहेत उरावर...”
आणि मला हेही तो म्हणायचा की “भेटत जा. तू भेटलास की बरं वाटतं. बोलावसं वाटतं. लोक टाळतात मला.”
आता संजय भुतकाळ आहे. वर्तमानात असे अनेक संजय आजूबाजुला असतीलच. याचे अर्थ आणि याची उत्तर काय हे प्रश्न तसेच पडून आहेत. कदाचित जगभर...