हल्ली मुद्दामून काही लिहावं असं वाटत नाही. मात्र सुचत राहावं इतकं वाटत राहतं ते बरय. एकूणच ब्लॉग माध्यमातून चालू असलेले लिखाण पाहून माझा गोंधळच होतो. त्याचं कारण असं की एकतर माझा पिंड (बहुदा. इथेही गोंधळ आहे तो आहेच) कवितेचा आहे. अगदी लिहिण्यापासून ते वाचण्यापर्यंत. दुसरं म्हणजे मी बराच लहरी महंमद आहे. त्यातही कॉलेज वयात आपण कुणीतरी महान कवीच
आहोत या भ्रमापासून ते ‘इदं न मम’ म्हणेपर्यंत माझी मजल पोहोचली आहे. एकूण काय तर ऐन प्रवाहात (खरतर प्रवाहाबरोबरच पण... तसं बोलायचं नसतं)
आपलं होडक घेऊन भरभर
वल्हा मारत सुटलेला मी आता या अथांग जलाशयात दिशाहीन आणि निरुद्देश झालो आहे. आता ज्या कुठल्या काठावर आपली नैय्या लागेल ती लागेल. आहे ते स्विकारण्यावाचून गत्यंतर नाही. माझ्या या परिस्थितीला ब्लॉग हे माध्यम अगदीच सुटेबल आहे. कारण इथे माझ्या सोईनुसार माझी साहित्यावरील
निष्ठा आणि त्यातली प्रतिष्ठा सांभाळता येतेय. मी मनाने कवी असेलही पण मी हाडा-मासाचा
कवी नाही हे माझ्या (उशिरा का होईना) लक्षात आलंय. सुबह का भुला शाम को लौट आये तो उसे भुला
नही कहते किंवा सो चुहे खाके बिल्ली चली हज को. यातील नेमका कुठला युक्तिवाद मला लागू पडतो
या विषयीही एक स्वतंत्र गोंधळ चालूच आहे. असो.
तर इतरांच्या
ब्लॉगविषयी मी काही बोलावं असा कुठला अधिकार मला मुळीच नाही. पण माझा गोंधळ नेमका कसा होतो ते पहायला दुसरा मार्ग नाही. आपले अनुभव आपल्या शब्दात मांडू देणाऱ्या या माध्यमात एकतर कविताच खूप
आहेत. (त्याला पर्याय नाही म्हणा. कॉंग्रेस गवतासारखे कवितांच बेसुमार पिक
येतंय ) पैसे कमवणे सोप्पं की अवघड? ठाऊक नाही तरीही बहुतांशी लोक पैसेच कमवतात तसच कविता लिहिणे सोप्पं की
अवघड? ठाऊक नाही तरीही बहुतांशी ‘साहित्यिक’ कविता(च) लिहितातच. या कवितांचा दर्जा हा विषय बाजूला ठेवला तर आपण कुणी वेगळे आहोत असं वाटत
नाही. आणि आपण जरा वेगळ्या दर्जाचे आहोत असा
अहंकारयुक्त प्रमाद करायला कुठले प्रमाणही नाही. मग आशय आणि अभिव्यक्ती या वाड़मयप्रचुर निकषांचा विचार करायचा झाल्यास माझे
स्थान कितीतरी खालचे असावे.
इतक्या दर्जेदार
कविता अथवा लेख नक्कीच ब्लॉग या माध्यमातून सर्रास आढळतात. मी माझा (कवितांचा) ब्लॉग सुरु केला तेव्हा इतरांचे ब्लॉग वाचून काही ठरविण्याची तसदी मी घेतली नाही. याउलट आता हेच माध्यम आपले तारणहार आहे असा नवा भ्रम घेऊन मी उत्साहाने
नव्या-जुन्या कविता माझ्या ब्लॉगवर पेरत बसलो. पण पुढे पुढे ब्लॉग विश्वच्या माध्यमातून अनेक ब्लॉग मला पहायला मिळाले
तिथे मला पहिला धक्का बसला.
तो असा की कितीतरी
ब्लॉग लेखकांनी आणि चालकांनी आपले खरेखुरे नाव न देता टोपण नावाने आपले मराठी
साहित्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. इथे दोन मुद्दे आहेत एकतर नाव न दिल्यामुळे एकूण साहित्य व्यवहारात
प्रसिद्धीचा जो फायदा होतो त्यापासून आपसूकच ते दूर आहेत. एक प्रकारे प्रचलित आक्षेपार्ह साहित्य व्यवहाराचा तो निषेधच आहे. दुसरं म्हणजे मुळातच माणसाचं
अस्तित्व हे प्रभावी असतं.
अशा वेळी आपलं लिखाण
प्रभावी आहे की नाही हे जोखण्याचा हा सर्वोत्तम मार्ग असावा कारण इथे नावच नाही
फक्त काम आहे. वाचक आणि रसिक यांच्यावर सोडलेली जबाबदारी. हे करायला बरीच ताकद लागते.
मला हे पूर्वीही करणं
शक्य झालं नाही आणि नंतर कळूनही आज पावेतो करू शकलो नाही.
माझी आणि ब्लॉगची ओळख व्हायलाही माझा चौकसपणा कामी
आला नाही. माझा एक मित्र आहे अवधूत डोंगरे. त्याने दाखवलेला त्याचा रेघ हा ब्लॉग बघून मी माझा ब्लॉग सुरु केला. तो ब्लॉगही पुरेसा वाचण्याची आणि त्याचा नीटसा अर्थ लावण्याची तसदी मी
घेतलीच नाही. पुढे त्याने भाऊ पाद्ध्ये, अशोक शहाणे, हमीद दलवाई , श्री. द. पानवलकर
इत्यादी ब्लॉग बनवले. त्यामागचा त्याचा उद्देश हाच की काळाच्या
ओघात नामशेष होत जाण्याऱ्या दर्जेदार साहित्यिकांच्या नोंदी करून ठेवणे. हे करतानाही आपले नाव सायलेंट राहील याची काळजी त्याने घेतली आहे. या निरपेक्ष भावनेच्या आणि प्रयत्नांच्या तुलनेत मी क्षुद्राहून क्षुद्र
आहे हे आज काल बऱ्याचदा जाणवत चाललय.
भरीत भर म्हणून उत्साहात मी त्यावेळी हा मुकामार ब्लॉगही सुरु केला.
आता सगळेच नाव लावणारे मुर्ख आहेत असाही माझा समाज
नाही. मात्र नाव असो वा नसो साधं, तरल, दैनंदिन जीवनाशी जोडलेलं, अभ्यासपूर्ण आणि प्रामाणिक भाव
घेऊन व्यक्त होणारं इथलं लिखाण वाचून (पाहून) धस्स व्हायला होतं हे खरंय.
(असं लिखाण
मोठ्याप्रमाणात नसलं तरीही ते आहे हे महत्वाचं ) त्यातल्यात्यात जाणवणारी एक गम्मत अशी की या सगळ्याला घेऊन लिखाण
करणाऱ्यांमध्ये महिला मंडळी खुपच आघाडीवर आहेत. साधे सुधे विषय, घुसमट, अनुभव व्यक्त करणाऱ्या यां महिलांच्या पोस्ट ब्लॉग माध्यमात खुपच छान वाटतात. त्यातली निरपेक्षता विशेष भावणारी आहे. संख्यात्मक दृष्टीने विचार करायचा झाल्यास पुरुषांचे ब्लॉग व्यक्त
होण्यापेक्षाही काहीतरी उभारू पाहण्याच्या उद्देशाचे आहेत असे वाटते. त्यातली भावना सहज-सुलभ नाही. (आता इथे स्त्री-पुरूष हा वाद नको. शिवाय माझा हाही अभ्यास पुरेसा आहे अशातला भाग नाही. वरवर पाहता जे जाणवतं ते हे.)
‘साहित्य’
या शब्दाचा मी जो
काही अर्थ लावतो आहे त्या अर्थाशी काडीमात्र संबंध नसणारे पण साहित्यावरच लिहू
पाहणारे अनेक ब्लॉग आहेत. असेनात का काही लोक तर लिखाणाच काय पण टाईप
करायचेही कष्ट न करता कॉपी पेस्टच्याच कामात माहीर आहेत. त्यातल्यात्यात साहित्य सोडून इतर विषय
हाताळू पाहणारे ब्लॉग बघून बरं वाटतं.
(माझी
त्यांच्याशी स्पर्धा नाही त्यामुळे असेल)
आता माझ्यासमोर प्रश्न असा उरतो तो हाच की, पुस्तकं, वर्तमानपत्र, ब्लॉग आणि इतर माध्यमांमध्ये चालू असलेल्या लिखाणापुढे माझं नक्की स्थान
काय? की मी अगदीच निरर्थक आहे? या प्रश्नाचं उत्तर काहीका असेना मुळात हा प्रश्नच निरर्थक आहे असं वाटतं. त्यात मला माझ्या अस्तित्वाचीच भीती अधिक आहे. जन्माला आलोय म्हणजे काहीतरी करूनच मेले पाहिजे. म्हणून काहीही करण्यात काहीच अर्थ नाही. (सुधारतोय न? ग्रेट, येस, कम ऑन. J)