Monday, July 25, 2011

अ'राजकीय'

ब-याचदा राजकीय पुढारी आपला पुढारपणा सगळ्याच बाबतीत दाखवत असतात. (काही अपवाद वगळू) पण कधी कधी त्यांचा हाच स्वभाव त्यांच्याच अंगलट कसा येतो त्याचा पुण्यात घडलेला हा एक मजेशीर किस्सा.

एक सन्माननीय राजकीय महाशय! (नुकतच त्यांच्या निवडीवरून एका राजकीय पक्षात मानापमान-संशयकल्लोळ-नाथ हा माझा-नाथा पुरे आता अशा आशयाच राजकीय नाट्याच क्रमशः थेट प्रक्षेपण घडून गेल्याचं आपल्या लक्षात असेलच. नेमक्या त्याच टायमाची गोष्ट.)(नाव मुद्दामहून सांगत नाही. घाबरतो. माफी!) सोयीसाठी त्याचं नाव आपण ‘अमुक अमुक’ असं मानू.

मुद्दा असा... की एका नामांकित दवाखान्यात गर्दीच्या वेळी फोन खणखणला आणि अचानक गडबड सुरु झाली. रिसेप्शनिस्टबाई डॉक्टरांच्या केबिनमध्ये पळाल्या. केबनही कधी नव्हे ते अस्वस्थ झालं. रांगेतले पेशंट आणि त्यांचे नातेवाईक संदिग्ध होऊन पाहू लागले. रिसेप्शनिस्ट काउंटरवर येताच "काय झालं हो? सिरीयस आहे का काही?" वगैरे वगैरे म्हणत नातेवाईक-पेशंट सरसावले. रिसेप्शनिस्ट म्हणाली; "अमुक अमुक त्यांच्या मुलीला घेऊन येत आहेत." आता हे अमुक अमुक नेमक्या त्याच काळात भलतेच हिट झाल्यामुळे गर्दीत कुजबुज वाढली. इतक्या वेळ अंगातली दुखणी घेऊन बसलेल्या बाकड्यांवर राजकीय दुखणी कण्हली जाऊ लागली.

जेमतेम दहाच मिनिटात अमुक अमुक महाशयांनी दवाखान्यात एन्ट्री मारली. रिसेप्शनिस्टबाईंनी ‘जबाबदारी’च्या ओझ्याखाली आपली भूमिका हसतमुख पार पाडली आणि केबिनचे दार उघडे करून दिले. आत जाण्यापूर्वी अमुक अमुकांनी पेशंट आणि नातेवाईकांकडे कृतार्थ नजर टाकली . वर आशिर्वादासारखा हातही उंचावला. लोकही आस्ते आस्ते सुखावले. कारण सुरवातीला सगळ्यांना असं वाटलं की ते कुण्या ओळखीच्या माणसालाच हात करताहेत. सगळ्यांनी एकमेकांकडे पाहून झाल्यावर काय ते ओळखलं.
हा ‘राजकीय पेच’ निर्माण झाला आणि नेमक्या त्याच वेळी ज्यांचा नंबर आला होता त्या सूनबाई जाम वैतागल्या होत्या। आपल्या ९२ वर्षांच्या सासूबाईंना लांबवरून आणून त्या दीडतास दवाखान्यात बसल्या होत्या. अमुक अमुक आत गेल्यापासून त्या फक्त रिसेप्शनिस्टपाशीच तळ ठोकून होत्या. "ही काही पद्धत झाली का? आधी सांगायला काय होतं? म्हातारं माणूस आहे. नंबर लावून काय फायदा?" वगैरे वगैरे. सुनबाईंच्या चढलेल्या पा-यामुळे म्हणा (अज्ञान होतच) की काय पण हे अमुक अमुक महाशय म्हणजे नेमके कोण नि काय याचा थांग पत्ता बाईना नव्हता. त्याचं नाव सोडलं तर त्यांच्या विषयी इतर काही माहिती करून घ्यायची तसदीही त्या बाईंनी मिळालेल्या वेळेत घेतली नाही. झालं...


वीसेक मिनिटांच्या तपश्चर्येनंतर अमुक अमुक पुन्हा त्याच कृतार्थतेची भावना चेहऱ्यावर घेऊन केबिनबाहेर आले. स्मित हास्य करत लोकंकडे बघतो न् बघतो तोच अमुक अमुक महाशयांवर त्या वैतागलेल्या सूनबाई कडाडल्या. अहो! एक मिनिट, तुम्ही जे कोणी असाल आम्हाला काही घेणं नाही. आम्ही काही मुर्ख आहोत का चार चार दिवस आधी नंबर लावायला आणि दोनदोन तास इथे वाट बघत बसायला? आले की चालले आत. जग म्हणजे काही जहागिरी वाटली काय?" बाईंचा टिपेचा स्वर ऐकून डॉक्टरही बाहेर आले.

आता यावर त्या महाशयांना शांत राहून मुद्दा हाताळताही आला असता. पण तेही त्या सुनबाईंच्या तारेला तार जुळवत म्हणाले ; "ओ बाई तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कुणाशी बोलताय?". बाई त्यांचा चढा आवाज ऐकून किंचित गडबडल्या ख-या पण वैतागाच्या भरात रिसेप्शन काउंटरवरची वही उलगडून म्हणाल्या; "ही आजची डेट आणि ही आज अपॉइंटमेंट असलेल्या पेशंट्सची नावे. यात मला तुमचं नाव दाखवा." तोच काही लोकांनी मध्ये पडून "सोडून द्या ताई. होतं असं. तेही बरेच बिझी असतात" असं सांगत प्रकरण शमवण्याचा प्रयत्नही केला. पण तरी त्या अमुक अमुक महाशयांचं नमतं म्हणून नाहीच; "हे बघा बाई मी दवाखान्यात एक फोन केला. मुलीसाठी सांगितलं, दवाखान्यातून ‘या’ असं मला कळवलं तेव्हा मी इथे आलोय. आता दावाखान्याने मला आधी नंबर दिला असला तर त्यात माझी काय चूक?" मुद्दा डॉक्टरांच्या कोर्टात गेल्यामुळे महाशयांची सरशी होणार असा विचार सगळ्यांच्या मनात येतो न् येतो तोच बाईंनी फूलटॉस टाकला. "वा वा वा वा. फोन केलात हे खरंय हो आम्ही सगळे इथेच होतो. पण त्या फोनवर आपण कोण आहात हे सांगायला नाही विसरलात ते? डॉक्टर काय करणार? " खेळ खल्लास.

अमुक अमुक महाशय तिरसटपणे मान झटकून दाराबाहेर पडले. सूनबाई सासूबाईंकडे वळल्या. लोकांमध्ये जरा खसखस पिकली. सूनबाईंच्या धाडसाचं नि त्याहून जास्त त्यांच्या हजरजबाबीपणाचं सगळ्यांनी अप्रूप व्यक्त केलं. शेवटी ९२ वर्षांच्या त्या आजीबाईंना घेऊन त्या डॉक्टरांसमोर बसल्या तेव्हा सूनबाई डॉक्टरांना म्हणाल्या; "माफ करा डॉक्टर. आमच्यामुळे...". डॉक्टर तत्काळ प्रांजळपणे म्हणाले ; "माफी कसली मागताय? उलट मीच तुमचे आभार मानायला हवेत. जे काम मला इतक्या वर्षात जमलं नाही ते तुम्ही चुटकी सरशी करून दाखवलंत. थँक्स!"

समांतर आणि सकारात्मक

किस्सा जवळपास तसाच. पात्रं वेगळी. (भ्यायचं कारण नाही म्हणून सागतो), कोथरूडच्या महात्मा सोसायटी वॉर्डचे मनसेचे नगरसेवक राजाभाऊ गोरडे यांच्या पत्नी याचं परिसरातल्या एका क्लिनिकमध्ये तपासणीसाठी गेल्या. ही गर्दी. (आपल्याकडं गर्दीला काही तोटाच नाहीये राव. जेवढे लोक क्रांति करायची म्हणताहेत तेवढ्याच लोकांना याच क्रांतिविषयी काही कल्पनाच नाहीये. असो. हे उगीचच :) क्रिएटीव्ह. असतो एकेकाचा पिंड.)

मुद्दा असा की मिसेस गोरडे क्लिनिकला गेल्या नंबर लावला. (आपण कोण आहोत हे त्यांनी मुद्दामून सांगितलं नाही; आणि ना त्या क्लिनिकच्या पोरीला ते माहित होतं.)
रांगेतल्या काही माणसांनी मात्र त्यांना ओळखलं आणि आपल्या पत्नी ऐवजी तुम्ही गेलात तरी चालेल अशी आदर वजा विनंतीही त्यांनी मिसेस गोरडेंना केल. तासाभराच्या त्या प्रतीक्षेत विचारणार्‍या प्रत्येकालाच त्यांनी शांतपणे उत्तर दिले, "नो, थँक्यू. माझा नंबर आला की जाते मी."


तात्पर्य :

आपल्या पदाचा अन् अधिकाराचा गैरवापर राजकीय लोकच करतात असं नाही. आपणही आपल्या पातळीवर तेच करत असतो. (राजकारण्यांना बदामान करणे हा या लेखामागचा उद्देश नव्हे.) आपल्याच अशा वृत्तीमुळे काही राजकारणीही असे वागायला धजावत असावेत. शेवटी मुठभर लोकांच्याच विकासाला आपणच कारणीभूत असूच ना?
(शंकेला आणि सुधारणेला बराच वाव)...