सोयीस्कर मुद्दा हातात लागला की उठ सुट आंदोलन अशी परिस्थिती आपल्याकडे उदभवली आहे. माध्यमे याला दोषी आहेत असं म्हणणंही सोईस्करच आहे. आण्णा हजारेंचे भ्रष्टाचाराविरुद्धचे आंदोलन आणि आत्ताचं बलात्कार थोपवण्यासाठी होणारं आंदोलन यातला सामान्य म्हणू पाहणाऱ्या नागरिकांचा सहभाग हा संशोधनात्मक विषय बनला आहे. साध्य आणि साधन यांच्यातले साधन मोठे झाले आहे आणि त्याविषयीची जाणीवच आंदोलनकर्त्या 'तरुणाई' उरलेली नाही. याउलट आंदोलनातून तथाकथित 'तरुणाई' भरकटतेय.
पण अगदी शांतपणे विचार केला तर लक्षात येतं की कुठला पुरुष किंवा स्त्री म्हणेल की बलात्कार व्हायलाच हवेत? कुणीच म्हणणार नाही. जाहीरच नाही तर मनातल्या मनातसुद्धा कोण म्हणेल की बलात्कार करायला काय हरकत आहे. मग बलात्काराविरुद्धची मशाल सरकारला दाखवून आपण काय साध्यं करतो आहोत? कुणाचेही कुठलही सरकार बलात्काराला उघड आणि छुपा पाठींबा देईल काय? काळ मीटीव्हीवर (चुकून ) एक बातमी पाहिली त्यात रिपोर्टर मुलगी रात्री रस्त्यावर उभी राहून तावातावाने सांगत होती की दिल्ली रात्री सुरक्षित कशी नाहीये. इथे कुणी पोलिस नाहीये.इतका मोठ्या घटनेनंतरही सरकार झोपलेलेच आहे.
सरकारने महिलांना सुरक्षा पुरवायला हवी हे म्हणायला आणि ऐकायला किती सोपे आहे. रस्त्यावर पोलिसांची लोकांनाच न आवडणारी गस्त वाढवली तरी बलात्कार फक्त रस्त्यावरच होतो असं मानण्यासारख आहे. (पोलिसांनी पोलिस स्टेशनात आणि जवानांनी सीमाभागात केलेल्या बलात्कारांच्या बातम्या तात्पुरत्या बाजूला ठेऊ.)
माध्यमं आणि सर्वसामान्य आजूबाजूचे लोक अशा तत्कालीन आंदोनालाच्या वेळी असं काही बोलत असतात की नक्की कसा विचार करावा हेच कळेनासं होऊन जातं. दिल्लीतली त्या मुलीची घटना आणि त्याला धरून चाललेलं आंदोनन यांचा ताळमेळ कसा घालावा हे ज्याचं त्यानं ठरवावं. पण काही मुद्दे नक्कीच मनात येतात की
१) दिल्लीतला बलात्कार हा आपल्याकडचा पहिला बलात्कार नाही मग आंदोलन आत्ताच व्हायचं कारण काय?
२) दिल्लीतला बलात्कार हा खुद्द दिल्लीतलाही पहिला बलात्कार नाही. मग हे निमित्त इतकं का डोकं वर काढतंय?
३) दिल्लीशिवाय इतर जवळपासच सर्वच राज्यात,शहरात,खेड्यापाड्यात बलात्कार होतच आहेत. मग दिल्लीच का?
४) बलात्कार करणारे गुन्हेगार सापडले आहेत त्यांना आपला गुन्हा मान्य आहे. तरी त्यांना शिक्षा झालीच पाहिजे असं मोठ्याने ओरडण्याचा नक्की अर्थ काय?
५) या गुन्हेगारांना जाहीर फाशी दिली तरी भावी गुन्हेगारांना जरब बसेल?
६)अशी 'हमखास यशस्वी' आंदोलने ही किती घातक आहेत. कारण उद्या या गुन्ह्यातल्या गुन्हेगारांना फाशी होईल आणि' इन्साफ मिल गया'च्या नावाखाली सगळे आनंदोत्सव साजरा करणार. आंदोलन संपून जाणार. पण बलात्कार संपतील? की आंदोलक बलात्कार थोपवण्यासाठी आपलं आयुष्य वेचत राहतील मरेपर्यंत?
बलात्कार, भ्रष्टाचार आणि कुठलाही अन्याय हा निंदनीयच आहे. पण ज्या आंदोलनात खात्रीशीर, परिणामकारक आणि कायमस्वरूपी उपाययोजनांचा अभाव आहे, इतकंच नव्हे तर मुळात अन्यायकारी कृत्ये माणसाच्या व्यक्तिगत विचारसरणीशीच अधिक निगडीत आहेत, आणि बहुतांशी प्रसंगी ती तात्कालिक स्वरुपाची सुद्धा आहेत अशावेळी मुद्दे उचलून आंदोलनात परावर्तीत करणं हे काय कमी अन्यायकारी आहे का? मुळात ही व्यापक अर्थाने पाहायचे झाल्यास आंदोलानेच नाहीत असे वाटते.
आपली सामाजिक आणि सरकारी व्यवस्था बाजूला ठेऊ.
मी आणि माझी बायको रोज जे जगतो त्यात कुणालाही कसलाही आक्षेप नसतो. कारण ते आपल्या सामाजिक चौकटीत बसणारं आहे.
उदाहरणार्थ आपण एक मुद्दा घेऊ : माझी बायको रोज स्वयंपाक करते. मी कधीच स्वयंपाक करीत नाही.
आता यात कुणालाही कसलाही आक्षेप नसतो. बायको आजारी असली, थकलेली असली तरी 'स्वयंपाक करणे ' या कृतिशी ती आणि माझा समाज कायम बांधील असल्यामुळे तिच्या स्वयपाक न करण्याच्या कृतीला तिलाच उत्तरे द्यावी लागतात. अमुक एक काम हे केवळ तिचच (स्त्री यां अर्थाने ) आहे हे माझ्या आईला सुद्धा मान्य आहे. त्यामुळे आजचा स्वयंपाक तू कर असं आई मला कधीही म्हणालेली नाही. आईने लहानपणी माझ्या बहिणीला स्वयंपाक करायला शिकवला मला नाही. मला एकूणच हे अन्यायकारी वाटत असलं तरी प्रत्यक्ष दररोज स्वयंपाक करणे हे आता माझ्यासाठी अवघड आहे. स्वयंपाक हे शंभर गोष्टीतली एक गोष्ट आहे निमित्तापुरती. आणि बाकी कैक मुद्दे माझ्यासाठी आजही अनभिज्ञच असावेत.
हे माझं रोजचं आयुष्य आहे. यात मी स्त्री-पुरुष समतेसाठी कुठल्या अर्थाने आंदोलन करू? समता हा एक विचार आहे. कृती अथवा घटना नव्हे. एकदा विचार पूर्ण झाला की त्याचा प्रभाव जगण्यातल्या प्रत्येक घटनेवर पडण्याची शक्यता अधिक असते. अमुक एक घटना घडून गेली किंवा अमुक एक कृती केली म्हणून समता कशी येईल? (हा विषय मोठा आहे याचा अंदाज असूनही मी हा लेख लिहिण्याची तात्पुरती आणि सूक्ष्म कृती केली आहे. )