Friday, December 31, 2010

गाववाला

परवा एक गाववाला मित्र दोनेक वर्षांनी भेटला म्हणे; "जमिन धरणात गेली. आमचं पुनर्वसन म्हणून जी जमिन दिलीय ती इतकी नापीक आहे की विचारू नकोस".
मनात म्हंटलं "मी कुठे विचारतोय....?"
मी म्हंटलं "मग सध्या पोटापाण्याचं काय?"
म्हंटला "तसं एका ठिकाणी ऑफिसबॉयचं काम करतोय नाही असं नाही पण खरं सांगू का?
गावाकडं होतं ते बरं होतं. इथे शहरात जीव नुसता..."(सगळं त्याच्या ग्रामिन भाषेत.)
हा भेटला की मला इरीटेट होतं. काहीही बोला हा नेहमी रडतच असतो... मी म्हंटलं "मग मिळालेल्या जमिनीचं काय करणार? विकणारेस?" म्हणाला "नाही अशी पुनर्वसनाची जमिन लगेच विकता येत नाही. नाय तर विकली असती." माझ्या "का?"वर म्हणाला "जमिनीत काय उरलय आता? " पुराण सुरू.
याला असं वाटत असावं की मी खूप सुखी आहे. का? तर मी नावापुरता गाववाला. शहरात वाढलेला. आता त्याला कोण काय करणार? असो.
त्यानं विचारलं लग्न झालं का? म्हंटलं नाही. तुझं?
म्हणाला "झालेलं। बायको सोडून गेली."
म्हंटलं "काय सांगतोयस? यातलं मला काहीच माहिती नाही। कधी?"
म्हंटला; "गावातल्या चांगल्या चमडीच्या पोरी सोडल्या तर अजून काय माहिती आहे तुम्हांला?"
"धरणात पायाखालची जमिन गेली नाही फक्त कैक आयुष्य। संसार संपले...! कुणाच्या तरी डोक्यात येतं इथे धरण बांधायचं... की बांधलं। धरणाला ना नाही; पाणी सगळ्यांना लागतं पण आज आमच्या जागेत ज्या लोकांसाठी पाणी साठवलं जातं त्या लोकांपुढं उभं रहायला भीती वाटते रे...! गाव धरणासाठी हलवायचा नाही म्हणून जे जे लढले ते आज गलेलठ्ठ झालेत. नसलेली झाडं दाखवून. त्यापैकी किती तरी लोक दारू ढोसून ढोसून संपायच्या मार्गावर आहेत.
नेत्यांनी फक्त पैसेवाल्यांनाच आपलं मानलय. पण गावातल्या टाळक्यांना कोण अक्कल देणार? ज्यांनी धरण बांधायचं ठरवलय ते हात झटकून उभेत. लोक डोळ्यांदेखत संपतातेत. बघवत नाही रे. कुठं अन कुणाचं चुकतं तेच धड कळत नाही."
"असो, असं खुप काही आहे, प्रॉब्लेम फक्त इतकाचे की गावाला काही उरलं नाही आणि शहरात कुणाला काही देणं-घेणं नाही. आज आत्महत्या केली तरी दखल घ्यायला मी शेतकरी नाही...! "
तो म्हणतोय ते सगळंच खरं असावं कारण त्याचं हे ‘रडणं’ वेगळंच वाटलं. जाता मी फ़क्त त्याचा मोबाईल नंबर घेतला आणि विचारलं "परवा काय करतो आहेस? भेटूयात."

2 comments:

  1. धरणासाठी जमीन गेली नसती तर हा माणूस पाऊस वेळेवर पडला नाही यासाठी रडला असता.

    ReplyDelete
  2. धरणाची आणि एकूणच विकासाची ही दुसरीही बाजू आहेच!

    ReplyDelete